Event Detail

मंत्री, आमदारांची कामे बाजूला ठेवा, पहिले काम सैनिक व त्यांच्या परिवाराचे करा.

मंत्री, आमदारांची कामे बाजूला ठेवा, पहिले काम सैनिक व त्यांच्या परिवाराचे करा.

जयहिंद फाउंडेशनच्यावतीने आयोजित शहीद सैनिक परिवार कृतज्ञता सोहळ्यात मंत्री देसाईंच्या अधिकाऱ्यांना सूचना.

सैनिक हा देशभक्तीच्या भावनेने जवान सैन्य दलात भरती होत असतो. त्याच्या जाणिवेतून माजी सैनिक कल्याण खात्यातील व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी देखील पुढाऱ्यांची कामे बाजूला ठेवून पहिले काम सैनिक व सैनिक परिवारांची केली पाहिजेत, असे प्रतिपादन माजी सैनिक कल्याण खात्याचे मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा येथे जयहिंद फाउंडेशनच्या वतीने आयोजित शहीद सैनिक परिवार कृतज्ञता व विधवा प्रथा मुक्त ग्रामपंचायत सन्मान सोहळ्यात ना. देसाई बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. शेखर निकम, पत्रकार प्रगती जाधव-पाटील, नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेवक अविनाश कदम, सभापती संकेत साठे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बर्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जयहिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे, बाबासाहेब कदम यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक संघटना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना वीरमाता व वीरपिता म्हणतात. मात्र त्यांच्या पत्नीला शासन दरबारी विधवा पत्नी असा उल्लेख केला जातो. विधवा ऐवजी वीरपत्नी असा बदल येत्या अधिवेशनात सामान्य प्रशासन विभाग व माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन नामदार शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले. आमदार शेखर निकम व पत्रकार प्रगती जाधव-पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. आमदार शेखर निकम यांनी जयहिंद फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत शहीद सैनिक परिवार कृतज्ञता सोहळ्यासारखा भव्य कार्यक्रम चिपळूण येथेही आयोजित करावा, अशी विनंती केली. या उपक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी प्रगती जाधव-पाटील यांनी शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते, याकडे लक्ष वेधले. या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे आणि संबंधितांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शासकीय स्तरावर प्रशिक्षित स्वयंसेवक (व्हॉलंटिअर्स) नेमण्याची मागणी त्यांनी केली. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी अशी यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जयहिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, नगरसेवक अविनाश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत मांढरे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन तावरे व केशव कोदे यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष अॅड. जयदीप भोसले यांनी मानले. कार्यक्रमासाठी जयहिंदच्या पुणे, सातारा, जावली, वाई, खटाव, बारामती, कराड, अमरावती व मुंबई शाखेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये शहीद जवान अमोल अरुण माने, मदन दत्ताजी जाधव, प्रवीण अंकुश वायदंडे, विनोद अंगद भोसले, शेखर भीमराव जगदाळे, योगेश गणपती गुरव, लक्ष्मण संजय पवार, अथर्व संभाजी कुंभार, प्रशांत दिलीप कदम, सागर परशुराम शिंदे, बाळासाहेब अंकुश पांढरे (अनुपस्थित), सचिन बाबुराव कापूरकर, विधीप दिलीप जाधव, सोमनाथ शामराव सुर्वे आणि प्रमोद जगन्नाथ कदम यांच्या परिवारांचा गौरव करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या त्यागाचे स्मरण केले. तसेच जयहिंद फाउंडेशनच्या “विधवा प्रथा मुक्त ग्रामपंचायत” या सामाजिक उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १७ ग्रामपंचायतींचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पुसेगाव, काटेवाडी, डिस्कळ, पेडगाव, भुरकवाडी, बुध, काळोशी, पोगरवाडी, अनपटवाडी, नागझरी, फडतरवाडी-नेर आणि कुमठे, पुणे जिल्ह्यातील लाटे व कांबळेश्वर, सांगली जिल्ह्यातील अग्रण धुळगाव व आरवडे तसेच सोलापूर जिल्ह्यातील दहिगाव ग्रामपंचायतींचा समावेश होता. समाजातील विधवा महिलांबाबतचा भेदभाव दूर करून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या यापैकी उपस्थित असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी जयहिंद फाउंडेशन राबवत असलेल्या उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विधवा महिलांच्या सन्मानासाठी कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करून समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शब्दांकन - मकरंद देशमुख (प्रचार आणि प्रसार विभाग प्रमुख, जयहिंद फाऊंडेशन) +९१ ९५०३०४०६९१ #जयहिंद_फाउंडेशन #शहीद_सैनिक_परिवार_कृतज्ञता_सोहळा #विधवा_प्रथा_मुक्त_ग्रामपंचायत #शंभूराज_देसाई #शेखर_निकम #प्रगती_जाधव_पाटील #सैनिक_कल्याण #वीर_पत्नी #शहीद_परिवार_सन्मान #सातारा #सामाजिक_परिवर्तन #ग्रामीण_विकास #माजी_सैनिक #वीरमाता_वीरपिता #सैनिक_सन्मान #Maharashtra #Satara #JaihindFoundation #SoldierFamily #VeerPatni #WidowFreeVillage #SocialInitiative #VeteransWelfare #TributeToMartyrs #NationFirst #RespectForSoldiers #CommunityLeadership #RuralTransformation #JaiHind 🇮🇳

Please Help Honor the Brave Souls Who Gave Their All